ओझर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी कोरोनामुक्त असलेल्या गावात शाळा सुरू करण्याचे संकेत दिले असताना पालकांमध्ये याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.सुरुवातीच्या लॉकडाऊन वेळी असणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गुणाकाराने वाढत असताना शहरी भागाला याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे येथे बाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढदेखील भयावह असल्याचे समोर आले आहे. यात सरकारने सोमवारी कोरोनामुक्त गावात ‘स्कूल चले हम’चा नारा दिला असला तरी शहरी भागाला लागून असलेल्या कोरोनामुक्त गावात आज मितीस बहुतांश शिक्षक हे शहरातून येत असल्याने पालकांनी मात्र मुलांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.एकीकडे नाशिकसारख्या ठिकाणी दररोज होणारी कोरोना रुग्णवाढ व उपनगरातील सील होणारे अनेक भाग बघता शिक्षकांचे वास्तव्यदेखील विविध भागात आहे. अशातच आमच्या गावात कोरोना नसला तरी उद्या शहरातून गावात यायला त्याला क्षणभरही वेळ लागणार नाही, असा पवित्राच पालक घेताना दिसत आहेत.आज नाशकातून ओझर, निफाड, दिंडोरी, वणी, कळवण, पेठ, इगतपुरी, चांदवड, येवला, मनमाड, नांदगाव आदी तालुक्यात शिक्षक ये-जा करतात. त्यात नाशिकसारख्या ठिकाणी सद्यस्थितीत रुग्णसंख्या वाढत आहे.परिसर सील होत आहेत. त्याच शहरातून शिक्षक जर गावाच्या शाळेत शिकवायला आलेच तर मनीध्यानी नसताना नको वाढवा अशा भावना पालक व्यक्त करीत आहेत. आज जिल्ह्यात शेकडो शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक शहरात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय सदर निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी पालकांनी व्यक्त केली आहे.--------------------------ज्यावेळी कडक लॉकडाऊन होता, त्यावेळी त्यात प्रतिबंधित क्षेत्रात शिक्षकांनी सेवा बजावत नोंदी ठेवल्या. अनेक शिक्षक शहरात वास्तव्यास आहेत. त्यातीलअनेक भाग प्रतिबंधित आहेत. आता कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करून शहरातील त्याच शिक्षकांना आताच्या घडीला शाळेत पाठवणे धोक्याचे आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर शाळा सुरू करावी. शासनाने सदरनिर्णयाचा फेरविचार करावा. पालकांनीदेखील याबाबत स्थानिक प्रशासनाकडे दाद मागावी.- मोहन चकोर,जिल्हा उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:02 IST