नाशिक : महापालिकेने शहरात सुमारे २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला, परंतु लागवडीसाठी १५ फुटावरील वृक्ष उपलब्ध होत नसल्याने ठेकेदारांनी माघार घेतली. त्यामुळे आता मनपाने नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून, त्यात लागवडीसाठी १५ फूट उंचीची झाडे लावण्याची अट शिथिल करत ती १० फुटांवर आणण्यात आली आहे. नव्या निविदाप्रक्रियेनुसार शहरात १० फुटांवरील १५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. महापालिकेने शहरात २१ हजार रोपांची लागवड करण्याचा निर्णय नऊ महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानुसार, महापालिकेने पाच ठेकेदारांना वृक्षलागवडीबरोबरच एक आणि पाच वर्षे देखभाल-संवर्धनाचा ठेका दिला होता. सुरुवातीला कडक उन्हाळा आणि शहरात सुरू असलेली पाणीकपात या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी पावसाळ्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याची परवानगी मागितली होती. याशिवाय, १५ फुटावरील वृक्षरोप उपलब्ध होत नसल्याने अट शिथिल करण्याची मागणीही केली होती. परंतु मनपा आपल्या अटींवर ठाम राहिली. दरम्यान, महापालिकेने सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर ठेकेदारांनी वृक्षलागवडीची तयारी दर्शविली आणि कामास सुरुवातही केली. एका ठेकेदाराने गुजरातमधून १५ फुटावरील ७३ वृक्षरोप आणून लावले, परंतु नंतर सुमारे २०० वृक्षांची उंची १५ फुटांपेक्षा कमी भरल्याने मनपाने त्यांना बाद ठरविले. १५ फुटांवरील वृक्ष उपलब्ध होत नसल्याने पाचपैकी चार ठेकेदारांनी चक्क माघार घेतली. त्यामुळे महापालिकेने सदर चारही ठेकेदारांना करारनाम्याचा भंग केला म्हणून काळ्या यादीत टाकले, तर एकमेव ठेकेदाराने १५ फुटावरील झाडे लावण्याची तयारी दर्शविली. (प्रतिनिधी)
वृक्षलागवडीसाठी अट शिथिल
By admin | Updated: August 14, 2016 02:27 IST