नाशिक : मार्चमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणाच्या नावाची निश्चिती करायची या मुद्द्यावरून अद्यापही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे समजते. त्यात प्रामुख्याने साहित्यिक भारत सासणे, ज्येष्ठ खगोलसंशोधक आणि साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या नावांबाबत विचार होत असल्याचे समजते.
साहित्य संमेलनाचे काही पदाधिकारी शनिवारी नाशिकमध्ये दाखल झालेले नव्हते. त्यामुळे अद्याप त्यांच्याशी चर्चा बाकी असल्याचेही समजते. मात्र, आतापर्यंत महामंडळाला विभागीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या नावांपैकी सासणे, डॉ. नारळीकर, वाघमारे यांच्या नावांवरच अधिक चर्चा होत आहे. डॉ. नारळीकर यांच्या काही अटींचीदेखील माहिती महामंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आली. तर सासणे यांच्या नावावर असलेल्या ग्रंथसंपदेसह विविध संमेलनांमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचा पट तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वाघमारे यांच्या कार्यकर्तृत्वाचा पट मांडून मते जाणून घेण्यात आली असल्याचे समजते.
इन्फो
संमेलनाध्यक्ष घोषणा आज
यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार, यावर महामंडळाच्या विभागीय कार्यालयांचे सर्व पदाधिकारी रविवारी दाखल होणार आहेत. सकाळच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदाबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत संमेलनाध्यक्षाचे नाव आणि साहित्य संमेलनाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.