लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो याकडे लक्ष असताना जे विद्यार्थी एटीकेटीमध्ये प्रवेशास पात्र आहेत त्यांना मात्र अजूनही प्रवेशाची चिंता आहे. या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज स्वीकारले गेले नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित अशा महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय जेथे आॅफलाइन प्रवेश आहेत अशा महाविद्यालयांनीदेखील प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येपेक्षा दहा पटीने अधिक अर्ज प्राप्त झाल्याने अशा ठिकाणी प्रवेशाची मोठी स्पर्धा असणार आहे. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ठराविक महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्यामुळे ठराविक महाविद्यालयांमध्येच मोठी गर्दी असणार आहे. अशावेळी एटीकेटी पात्र उमेदवारांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना सवलत मिळूनही त्यांना प्रवेश मिळेलच याची फारशी शाश्वती नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अकरावीसाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र एटीकेटी म्हणजे अकरावी प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था नसल्याने या विद्यार्थ्यांना गृहीत न धरता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचाच अर्थ प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयांचे सर्व प्रवेश पूर्ण झालेले असतील शिवाय काही विनाअनुदानित तुकड्यांना देखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तातडीने अतिरिक्त तुकडीदेखील मंजूर होऊ शकते. परंतु हा सारा खटाटोप गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठीच राहणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना कोटा पद्धतीनेही प्रवेश दिला जाऊ शकतो.
ंएटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता
By admin | Updated: July 3, 2017 01:00 IST