त्र्यंबकेश्वर : साधु-मंहतांनी सुचविलेली सिंहस्थ विषयक कोणतीही कामे शिल्लक राहणार नसून सर्व कामे वेळेत पूर्ण करून घेऊ त्यासाठी निधी वाढला तरी चालेल. त्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास जिल्हा संपर्क मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. महाजन म्हणाले की माझ्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची तर जबाबदारी आहेच पण सिंहस्थ संपर्क मंत्री म्हणून नव्याने पद निर्माण करून सिंहस्थाची जबाबदारी टाकली आहे. त्र्यंबक येथे महाजन यांचे सकाळी आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेथुन कार्यकर्त्यां समेवत त्यांनी कुशावर्त तिर्थ तसेच गोदावरी पात्राची दुर्दशा त्यांनी पाहिली परत येतेवेळेस स्वामी सागरानंद आश्रमात जाऊन त्यांच्या समवेत चर्चा केली. तेथुन रेणुका मंगल कार्यालयात सभास्थानी आगमन झाले. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी संक्षिप्तपणे आराखडा विशद केला. सर्व कामांच्या प्रगतीची माहिती दिली. तर त्र्यंबकेश्वर अखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती व महामंत्री हरीगिरीजी महाराज यांचा महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महंत हरिगिरीजी महाराज यांनी साधु-अखाड्यांच्या समस्या मांडून काही मागण्यांचे निवेदन सादर केले. महंत शंकरानंद यांनी निवेदन देऊन पुनश्च कामे सुचविली. तर सामाजिक कार्यकर्ते व विहिंपचे तालुका प्रमुख गोविंद मुळे यांनी त्र्यंबक पालिकेची आर्थिक बाब कमकुवत असून, बऱ्याचवेळा अनुदानावर विसंबुन राहावे लागते. सध्याच्या कामात दर्जा-वेळ यांची सांगड घालून भ्रष्टाचार होणार नाही याकडेही लक्ष द्यावे असे सुचविले. पालकमंत्री भाषणात म्हणाले, सिंहस्थ कामांकडे आपण जातीने लक्ष घालुन गोदावरी प्रदुषणास प्राधान्य देणार असून येत्या ३ ते ४ महिन्यात गोदावरी प्रदुषण रहित करण्यावर कटाक्ष राहणार असल्याचा विश्वास दिला. साधु-महंतांनी दिलेल्या वाढीव कामांच्या यादीचाही सिंहस्थ कामात समावेश करू त्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही. सिंहस्थ नियोजन चांगले होण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, लक्ष्मण सावजी, सतीश कुलकर्णी, अॅड. श्रीकांत गायधनी, लक्ष्मीकांत थेटे, प्रशांत गायधनी, उदय दिक्षित, तृप्ती धारणे, नगराध्यक्ष अलका शिरसाट, उपनगराध्यक्ष ललीत लोहगावकर, नगरसेवक रवी सोनवणे, लढ्ढा, सौ. अंजनाबाई कडलग, शकुंतला वाटाणे आदी उपस्थित होते.
सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण करू : महाजन
By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST