नाशिक : शहरात येत्या सोमवारपासून (दि.७) पाणीकपात करण्यात येणार असून, त्यासाठी पालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. कोणत्या जलकुंभावरून किती वाजता पाणीपुरवठा केला जाईल, याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात आॅगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा असावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ७ जुलैपासून शहराच्या ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या भागात एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अर्थात, एकवेळ पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देण्यात येणार आहे, तर ज्या भागात एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येतो तेथे कोणत्याही प्रकारे पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहराला रोज चारशे दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो. त्यापैकी ६० दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होईल, असे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)