नाशिक : महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयासह आख्ख्या मेनरोडला हातगाड्यांवर विविध व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सचा पडलेला विळखा नाशिककरांना नवीन नाही. महापालिकेचा अतिक्रमण विभाग मेनरोडवर कधी-कधी लुटुपुटुची लढाई लढत असतो; परंतु त्यांची पाठ फिरली की पुन्हा सारे ‘जैसे थे’. गुरुवारी माजी महापौर व स्थानिक नगरसेवक असलेल्या विनायक पांडे यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे या अतिक्रमणाबाबत तक्रार केली आणि विभागीय अधिकाऱ्यांनीही तत्परता दाखवत पालिकेसमोरील हातगाड्यांवरील माल जप्तीची कारवाई केली. अचानक झालेल्या या मोहिमेने मेनरोडवर पळापळ होऊन तणावही निर्माण झाला होता; परंतु नेहमीप्रमाणे विभागाचे वाहन गेल्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती पाहण्याचा अंक व्यापारी व नागरिकांनी अनुभवला. हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी संपूर्ण मेनरोडवर कब्जा केला आहे. रस्त्यांत थेट हातगाड्या उभ्या करून दिल्या जात असल्याने पादचाऱ्यांनाही चालणे अवघड होऊन बसते. हातगाड्यावाल्यांनी तर चक्क जुन्या नगरपालिकेच्या इमारतीलाच विळखा घालत आपली मुजोरी दाखविली आहे. या व्यावसायिकांच्या गर्दीमुळे मेनरोडवर वाहन पार्क करणेही मुश्किल बनते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी आली की तेवढ्यापुरता पळापळ होते; परंतु नेहमी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने मेनरोडचा प्रश्न नेहमीच डोकेदुखी होऊन बसला आहे. याच प्रभागात माजी महापौरांचे जुने निवासस्थान असून, त्यांचा नेहमीच वावर असतो. गुरुवारी नगरसेवक विनायक पांडे यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाविषयी तक्रार केली आणि विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांनी वेळ न दवडता लगेचच तत्परता दाखवत हातगाड्यांवरील माल जप्त करण्याची कारवाई सुरू केली. विनायक पांडे यांच्या उपस्थितीत विभागीय अधिकाऱ्यांनी मेनरोडवरील काही विक्रेत्यांचा माल उचलून घेत तो गुदामात जमा केला. अचानक झालेल्या या कारवाईने मेनरोडवर पळापळ झाली. (प्रतिनिधी)नगरसेवक विनायक पांडे यांनी अतिक्रमणाविषयी तक्रार केल्यानंतर मेनरोडवर कारवाई करण्यात आली. यावेळी हातगाड्यांवरील माल जप्त करण्यात आला. यापुढे रोज कारवाई केली जाणार आहे. - मालिनी शिरसाठ, विभागीय अधिकारीमेनरोडवरील अतिक्रमणप्रश्नी वारंवार तक्रारी करूनही निष्क्रिय प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. अतिक्रमण उपआयुक्त तर अकार्यक्षम अधिकारी आहेत. मेनरोडवर पादचाऱ्यांना चालणे अवघड होऊन बसते. - विनायक पांडे, माजी महापौर
नगरसेवकाची तक्रार अन् ‘तत्पर’ प्रशासन
By admin | Updated: April 23, 2015 23:53 IST