नाशिक : वीजबिल भरणा होऊनही जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने महावितरणकडे वीजबिलाची सुमारे ३३ कोटी रुपयांची रक्कम वर्गच केली नसल्याने महावितरण कंपनीने जिल्हा बॅँकेविरोधात मुंबईनाका पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी उपनगर, भद्रकाली आणि मुंबईनाका पोलिसांनीही फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिला. वेतनाच मुद्द्यावरून शिक्षकांनी जिल्हा बॅँकेविरोधात आंदोलन सुरू केले असतानाच महावितरणनेदेखील महावितरण विरोधात तक्रार दाखल केल्याने बॅँकेपुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा बॅँकेकडे वीजबिल भरणा केंद्र आहे. बॅँकेचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाळे असल्याने ग्राहकांना वीजबिल भरणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हा बॅँकेच्या जिल्ह्यातील शाखांमध्ये वीजबिल भरण्याची सुविधा करार पद्धतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे दरमहा बॅँकेकडे वीजबिलापोटी कोट्यवधींची रक्कम जमा होते. त्यातून बॅँकेला चांगले कमीशन मिळते, परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने बॅँकेने महावितरणचीच कोंडी केली आहे. त्यामुळे महावितरणने दोनच दिवसांपूर्वी जिल्हा बॅँकेच्या वीजबिल भरणा केंद्रात वीजबिल भरू नये, असे आवाहन आपल्या ग्राहकांना केले होते. असे असतानाही जिल्हा बँकेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आणि गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिलाची वसूल रक्कमच महावितरणकडे वर्ग न केल्याने महावितरणने जिल्हा बॅँकेविरोधात पोलिसांत तक्रार अर्ज दिला. नाशिक आणि मालेगाव मंडळातील वीजग्राहकांकडून बॅँकेने वीजबिलाची रक्कम जमा केली आहे. नियमानुसार सदर रक्कम बॅँकेने महावितरणला देणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही हिशेब देण्यात आलेला नाही. नाशिक शहर मंडळात दि. १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान १३ कोटी २६ लाख १४ हजार २६२, तर १ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान ३ कोटी ९६ लाख ४२ हजार ६०५ असे एकूण १७ कोटी २२ लाख ५६ हजार ८६७ जिल्हा बॅँकेकडे जमा आहेत. तर मालेगाव मंडळातील १ ते ३१ मार्च या कालावधीत जमा झालेले ११ कोटी ८४ लाख ४५ हजार ४९५, तर १ ते २४ एप्रिल दरम्यान ४ कोटी १५ लाख ३५ हजार २९५ असे एकूण १५ कोटी ९९ लाख ८० हजार ७९० रुपये जिल्हा बॅँकेकडे पडून आहेत. या दोन्ही मंडळांचे एकूण ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये जिल्हा बॅँकेकडे जमा आहेत. मात्र ही रक्कम बॅँकेने महावितरणकडे जमा न केल्याने महावितरणने पोलिसांत धाव घेतली आहे.
जिल्हा बॅँकेविरोधात पोलिसांत तक्रार
By admin | Updated: April 28, 2017 02:13 IST