नाशिक : पालकांकडून शुल्क वसुलीची एकही संधी न सोडणाऱ्या खासगी विनाअनुदानित शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या आपल्याच शाळेतील विद्यार्थ्याकडून पुढील वर्गातील प्रवेशासाठी शुल्क आकारले जात आहे. यातील अनेक शाळा तर पालकांना प्रवेशाची पावतीही देत नसल्याने यात मोठा गैरप्रकार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाकडून दरवर्षी १० ते २० हजार रुपये उकळले जात आहेत. अॅडमिशन कन्फर्मेशनच्या नावाखाली पालकांची लूट सुरू असून, या अनैतिक वसुलीकडे शिक्षण विभाचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ज्या शाळा अशा प्रकारचे शुल्क आकारत आहेत त्या शाळांचे शुल्क पत्रक पाहिल्यास त्यामध्ये अनेक कॉलम असे असतात की त्यामध्ये नाहक शुल्क आकारले जाते. कोणतेही हेड टाकून त्यातून वसुली केली जात आहे. वास्तविक कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासनपातळीवर अनेक उपाययोजना राबविल्या जातात. परंतु इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित आणि तत्सम प्रकारच्या शाळा या मात्र मनमानी करीत आहेत. आपल्या शाळेतील विद्यार्थ्याने पैसे भरून पुढच्या वर्गात प्रवेश निश्चित केला नाही, तर त्या जागी बाहेरच्या विद्यार्थ्याला प्रवेश देऊन आपल्याच शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. अशा नफेखोरी करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकवर्गाकडून होत आहे. (प्रतिनिधी)
पुढच्या वर्गासाठीही भरमसाठ शुल्क
By admin | Updated: April 27, 2016 23:12 IST