नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर कायम आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, गुरुवारी (दि. १२) नाशिकची राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून पुन्हा नोंद करण्यात आली आहे.गेल्या बुधवारी सकाळी हवामान खात्याने ५.८ अंश इतके हंगामातील सर्वांत नीचांकी तपमान नोंदविले होते. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी पारा ५.२ अंशांवर आला आहे.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. अहमदनगरचे किमान तपमान ६.८, मालेगाव ७.०, पुणे ७.४, सातारा ९.५, सांगली ११.५, सोलापूर १०.६, अकोला ८.०, अमरावती ८.४, महाबळेश्वर ११.८ असे तपमान पुण्याच्या वेधशाळेने नोंदविले आहे.वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, डॉक्टरांकडून पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरामध्ये दोन दिवसांपासून दिवसभर हवेत गारवा क ायम असून, संध्याकाळी त्यात वाढ होत असल्याने नाशिककर सध्या दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे.
निफाड @ 4निफाड : तालुक्यातील कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने संपूर्ण निफाड तालुका गारठून गेला होता. यावर्षी या तालुक्यात हे ४ अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी तपमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी तालुक्यात पाऊस चांगला झालेला असून, कडाक्याच्या थंडीने मधून मधून या तालुक्याला गारठून टाकले आहे.