ठेंगोडा : येथील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर असलेल्या गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बंद करण्यात आला आहे़महाड, जि. रायगड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकाळातील पूल पुराने वाहून गेल्याची दुर्घटना घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. येथील गिरणा नदीवर ब्रिटिशांनी १९४४ मध्ये बांधकाम केलेला नऊ मीटरचे वीस गाळे असलेला पूल वाहतुकीसाठी बांधला होता. ७२ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने तयार केलेल्या या पुलाची मुदत संपल्याबाबत पत्रव्यवहार करून त्याचे उत्तम प्रशासनाचे उदाहरण दिले आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने चणकापूर धरणातून १८ हजार क्यूसेक पाणी तर पुनंद धरणातून ही १६ हजार क्यूसेक पाण्याच विसर्ग सोडण्यात आले. यावेळी नदीला काल मोठा पूर येऊन जवळपास गिरणा नदीतून ३६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत होता. पुलाला पाणी लागण्यास जवळपास चार पाच फूट शिल्लक राहिले होते. तरीही या पुलावरून दिवसभर सर्वच वाहने जात होते. महाड येथील घटना घडल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली; मात्र सदर पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असून, नदीचे पाणी ओसरल्यावर पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.एस. सोनार यांनी दिली. (वार्ताहर)
गिरणा नदीवरील जुना पूल बंद
By admin | Updated: August 5, 2016 00:30 IST