नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात महिनाभर सुमारे ९०० स्वयंसेवकांच्या मदतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या कल्की मानव सेवा समितीच्या वतीने तिसरी पर्वणी आटोपल्यानंतर गोदाघाटावर निर्माण झालेला कचरा हटविण्यात येऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सिंहस्थ कुंभपर्वातील अखेरच्या पर्वणीला लाखो भाविकांनी हजेरी लावली. पावसामुळे घाटावर बराच कचरा निर्माण झाला. तसेच अनेक बेवारस वस्तू, कचरा, कपडे, प्लॅस्टिक पिशव्या, चहाचे कप आदि साहित्य घाटावर पडलेले होते. पर्वणीनंतर कल्की सेवा समितीच्या सुमारे ३०० स्वयंसेवकांनी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत स्वच्छता मोहीम राबविली. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांनी रामकुंडावर या मोहिमेचा शुभारंभ केला. मोहिमेत अध्यक्ष निवेदना दासाजी, शक्ती टर्ले, एस. पी. जाधव, वैद्यनाथन, अमोल कदम, सचिन काळे, अभिजित कुऱ्हाडे, नीलेश थोरात, सागर चौरे, ज्योत्स्ना पगारे, प्रतिभा पाठक, ज्योती भालेराव, पुष्पावती सराफ, भावना पाटील आदि सहभागी झाले होते. समितीच्या वतीने येत्या ३ आॅक्टोबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने संत जनार्दन स्वामी आश्रमात हे शिबिर घेण्यात येणार असल्याचे शक्ती टर्ले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कल्की सेवा समितीतर्फे गोदाघाटाची स्वच्छता
By admin | Updated: September 21, 2015 23:49 IST