लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : संततधार पावसामुळे खळखळून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून जेलरोड दसक घाटावर मनपा स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी सुमारे अडीच टन पाणवेली जमा करून घाट स्वच्छ केला. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व आजूबाजूच्या भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने गोदामाई खळखळून वाहत आहे. यामुळे नदीतील पाणवेली मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने जेलरोड दसक घाटावरील काही पायऱ्यांवरून नदीतील पाणी वाहत होते. काही प्रमाणात शनिवारी नदीपात्रातील पाणी ओसरल्याने दसक घाटावर सर्वत्र गाळ साचलेला होता, तर नदीपात्रातील लोखंडी रॅलिंग, खडक आदि ठिकाणी पाणवेली अडकलेली होती. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, विकास शेळके, नारायण दाभाडे, बाळू आढाव आदि कर्मचाऱ्यांनी शनिवारी नदीपात्रात अडकलेली व वाहून जाणारी सुमारे अडीच टन पाणवेली काढून घंटागाडीत जमा केली. तसेच दसक घाट पाण्याने धुऊन स्वच्छ केला. पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाणारी पाणवेली आरोग्य-स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातून बाहेर काढल्याने नदीपात्र स्वच्छ होण्यास हातभार लागला आहे.
दसक घाटावर मनपाची स्वच्छता मोहीम
By admin | Updated: July 16, 2017 00:04 IST