सिन्नर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस ठाणे व वसाहतीची साफसफाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत हरिदास डोळे, अंजली राजपूत, संतोष चव्हाण, मधुकर देशमुख, एम. बी. खतीले, टी. के. अढांगळे, सोमनाथ बोऱ्हाडे, एस. बी. घायवट, सुदाम धुमाळ, आर. बी. वानखेडे आदिंसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपालिकेचे तीन ट्रॅक्टर व १५ सफाई कामगारांच्या मदतीने पोलीस ठाणे पोलीस वसाहतीतील कचरा गोळा करण्यात आला. वसाहतीतील गवत काढून नाले सफाई करण्यात आली. पावडर व प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करून डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण पोलीस वसाहतीचा परिसर झाडून काढला. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सामान्य जनतेची काळजी घेण्यात व्यस्त राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान राबवित जनजागृती केली.(वार्ताहर)
स्वच्छता मोहीम : पोलीस ठाणे व वसाहत परिसराची साफसफाई
By admin | Updated: November 21, 2014 22:46 IST