नाशिक : शहराच्या बससेवेसाठी महापालिकेने अनेक नावे मागवली असली तरी त्यातील सिटी लिंक ही सेवा तर नाशिक कनेक्ट ही टॅगलाईन जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान बससेवेचे तूर्तास गोल्फ क्लब जवळील मनपाच्या एका छोट्या इमारतीत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या सेवेसाठी लागणाऱ्या तब्बल बारा सॉफ्टवेअरची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षंपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा नाशिक महानगर परिवहन महामंडळ या कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. अर्थात, महामंडळाने स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला नसून राज्य परिवहन महामंडळाचे दोन निवृत्त अधिकारी मानधनावर नियुक्त करण्यात आले आहेत. बाकी अन्य कार्यभार सध्या आयुक्तांबरोबर शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, बी. जी. माळी यांच्यासह अन्य स्थानिक अभियंत्यावर आहे. त्यामुळे सध्या महापालिकेत महत्त्वाचे काम होत असले तरी तूर्तास गोल्फ क्लबजवळील दुमजली इमारतीत कार्यालय थाटण्यात आले आहे. दुसरीकडे १ जानेवारीपासून चाचणी तर २६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय तयारीदेखील वेगाने सुरू आहे.
महापालिकेने बससेवेसाठी बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य स्पर्धा घेतली होती. त्याला फार प्रतिसाद मिळाला नसला तरी महापालिका आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर सिटी लिंक सेवा मान्य केली असून, त्याला नाशिक कनेक्ट ही टॅगलाइन असणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना सहजपणे बससेवेचे नाव घेता यावे यादृष्टीने नाशिक कनेक्ट निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुढील आठवड्यात मनपाच्या महामंडळाची थेट वार्षिक सभा होणार आहे. त्यावर या ब्रीदवाक्याबराोबर अनेक प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
इन्फो...
बारा सॉफ्टवेअरची तपासणी
या सेवेसाठी महापालिकेने तिकिटापासून बस ट्रॅकिंग, बस ऑपरेशन असे सुमारे बारा सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. हे सॉफ्टवेअर नियमानुसार आहेत किंवा नाही आणि त्यांचे प्रत्यक्षातील कार्य याची चाचपणी करण्यात येत आहे.
-----------
छायाचित्र राजु ठाकरे