विजय मोरे नाशिक,शहराची वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी यामुळे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन परिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करण्यास शासनाच्या गृह विभागाने बुधवारी मंजुरी दिली आहे़ शासनाच्या या निर्णयामुळे या दोन्ही परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक सहायक पोलीस आयुक्त मिळणार आहे़ यापूर्वी एकच सहायक पोलीस आयुक्ताकडे ही जबाबदारी होती़ शासनाच्या या निर्णयामुळे सहायक पोलीस आयुक्तांच्या कामाचे वाटप होऊन कामाचा ताण कमी होणार आहे़नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाचे २९ सप्टेंबर १९९० मध्ये विभाजन होऊन शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आले़ २००९ पर्यंत परिमंडळ एक व त्याच्या अंतर्गत दोन विभाग कार्यरत होते़ यानंतर शासनाने २२ आॅक्टोबर २००९ ला विभाग दोनसाठी पोलीस उपआयुक्तपद मंजूर केले़ तेव्हापासून आयुक्तालयात परिमंडळ एक व परिमंडळ दोन असे दोन विभाग कार्यरत आहेत़आयुक्तालयातील या दोन्ही विभागातील पोलीस उपआयुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांचा दर्जा व अधिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता असून, त्यांचे कार्यक्षेत्र एकच आहे़ त्यामुळे प्रशासकीय दृष्टिकोनातून या दोन्ही परिमंडळाचे आणखी दोन विभागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला़ या नवीन विभागांचे कामकाज सद्यस्थितीत मंजूर असलेल्या सहायक पोलीस आयुक्तांद्वारे करावा, असेही या आदेशात म्हटले आहे़शासनाच्या विभाजनाच्या निर्णयापूर्वी परिमंडळ एकमध्ये भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर आडगाव या पाच पोलीस ठाण्यांचा तर परिमंडळ दोनमध्ये सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प अशा सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे़ शासनाने नवीन विभागाला मंजुरी देताना म्हसरूळ व मुंबई नाका या दोन नवीन पोलीस ठाण्यांचाही समावेश केला आहे़
शहराला मिळणार आणखी दोन एसीपी
By admin | Updated: August 20, 2015 00:04 IST