चांदवड : शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कुलस्वामिनी श्री रेणुकामातेचे एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. यंदा भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ फुलली होती तर झेंडूचे भाव वधारल्याने नागरिकांनी खरेदी करण्यास हात आखडता घेतला.यावेळी गर्दीमुळे संस्थान व पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडला. पूर्वापार चालत असलेल्या प्रथेनुसार श्री रेणुकादेवी मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीत श्री रेणुकामातेची प्रतिमा, सुवर्ण अलंकार, अहिल्यादेवीची प्रतिमा असते. या पालखीस मोठा बंदुकधारी पोलीस बंदोबस्त असतो. सदरची पालखी रेणुका मंदिरातून पुरातन मनमाड-लासलगाव चौफुलीवरील श्री खंडेराव महाराज मंदिरात नेण्यात आली. यावेळी पालखीस ठिकठिकाणी सुवासिनींनी ओवाळले. परंपरेनुसार खंडेराव महाराज मंदिरात जाऊन दर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या मंदिरातही पुरोहित अंबादास दीक्षित, अरुण दीक्षित यांनी आपट्याची झाडे व पूजा साहित्य मांडले होते. मंत्रोपचारात अनेक भाविकांनी सीमोल्लंघन केले. याप्रसंगी रेणुकादेवी संस्थानच्या वतीने व्यवस्थापक एम.के. पवार, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर वराडे, कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला. नऊ दिवस साजरा होणारा नवरात्र उत्सव कुठलाही अनुचित प्रकार न घडता संपन्न झाल्याबद्दल संस्थानच्या वतीने पवार व पोलीस प्रशासनाच्या वतीने बहिरट यांना भाविकांना धन्यवाद दिले. दरम्यान, दररोज श्री रेणुकादेवी मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजावट करण्याचे काम चांदवडचे बाळासाहेब होनराव यांनी केले तर दररोज नवनवीन आकर्षक फुलांची सजावट केल्याने भाविकांना मनमोहक वाटत होते. संस्थानच्या वतीने पोलीस, गृहरक्षक, स्वयंसेवक व दररोज महाप्रसाद देण्यात आले. गर्दीवर विशेष नियंत्रण करण्यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेतले व यात्रोत्सव शांततेत संपन्न केला. येथील म्हसोबा चौकातील सप्तशृंगीदेवी मंदिर, म्हसोबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुजारी शांताबाई रानडे, वसंत सखाराम अहेर यांनी व्यवस्था पाहिली तर अष्टमीला सप्तशृंगी मंदिरात घागरी फुंकण्याचा व राहाडीचा कार्यक्रम झाला. येथेही भाविकांची प्रचंड होती. गावातील श्री महालक्ष्मी मंदिर, गुजराथ गल्लीतील कच्छादेवी, तुळजा भवानी मंदिराची व्यवस्था वृत्तपत्र विक्रेते सोनुपंत ठाकरे, सूर्यकांत ठाकरे, जयवंत ठाकरे यांनी बघितली. कालिका मंदिराची व्यवस्था गोसावी परिवाराने तर कोंबडवाडी येथील भैरवनाथ मंदिराची व्यवस्था जोशी परिवाराने बघितली या सर्व मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (वार्ताहर)
चांदवड शहरात दसरा उत्साहात
By admin | Updated: October 23, 2015 00:09 IST