सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी तत्पर सोडविल्या जाव्यात, यासाठी सिडको विभागीय कार्यालयातच स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष उभारलेला आहे; परंतु या तक्रार निवारण कक्षात कर्मचारीच नसल्याचा अनुभव नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांना आला. यामुळे तक्रार निवारण कक्ष नावापुरताच असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.तत्कालीन मनपा आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष उभारण्याची संकल्पना सुरूकेली आहे. यात नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी तत्पर सोडविल्या जाव्यात, तसेच त्यांना त्यांची तक्रार प्रत्यक्ष निवारण कक्षात जाऊन अथवा भ्रमणध्वनी करून करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दैनंदिन तक्रारींमध्ये घंटागाडी न येणे, पथदीप बंद असणे, ड्रेनेज चोकअप होणे, पाणीपुरवठा न होणे, कुत्रे मृत होणे, साफसफाई न होणे आदिंसह अनेक तक्रारी या मनपाच्या वतीने सोडविण्याची व्यवस्था कारण्यात आली आहे; परंतु मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात निवारण कक्षात तक्रार घेण्यासाठी कर्मचारीच नसल्याचा अनुभव नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांना आला. अॅड. शेळके यांच्याकडे प्रभागातील नागरिकांनी तक्रारी सांगितल्या. त्यासाठी अॅड. शेळके यांनी तक्रार निवारण कक्षातील भ्रमणध्वनी क्रमांक लावला; परंतु बऱ्याच वेळ भ्रमणध्वनी कोणीही उचलत नसल्याने त्यांनी थेट तक्रार निवारण कक्षात जाणे पसंत केले. यावेळी त्यांना तिथे कोणीही कर्मचारी दिसले नाही. यानंतर अॅड. शेळके यांनी तक्रार निवारण कक्षातील टेबलवरच बेवारस पडलेल्या नोंदवहीत कर्मचारी नसल्याचे लिहून दिले. तक्रार निवारण कक्षात तक्रारीसाठी जाणाऱ्या नागरिकांना आपली तक्रार देण्याऐवजी तक्रार निवारण कक्षातील तक्रारी आढळत असल्याने तक्रार निवारण कक्ष नावापुरताच असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
सिडको : कक्षाला नाही वाली; नगरसेवकानेच उघड केला प्रकार
By admin | Updated: May 7, 2015 23:50 IST