सिडको : येथील महाजननगर जयहिंद कॉलनी परिसरात समाजकंटकांनी घरासमोर पार्किंगच्या जागेत लावलेली रिक्षा, तसेच दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे गुन्हेगारांनी डोके वर काढल्याची चर्चा दिवसभर सिडको भागात सुरू होती.सिडको भागात दुचाकी, तसेच चारचाकी जाळपोळीचे प्रकार नवा नसून मध्यरात्री रिक्षा, तसेच दुचाकी जाळण्याच्या प्रकारामुळे गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. सिडकोतील अंबड-लिंकरोड लगत असलेल्या महाजननगर येथील अमिकुंज रो-हाऊस येथे सिकंदर प्रसाद राय हे कुटुंबासमवेत राहतात. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राय यांची घरासमोर लावलेल्या रिक्षाला (क्र. एमएच १५-झेड ५३३४) अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान शेजारीच राहणारे रमेश ठाकरे यांचीही दुचाकी (क्र. एमएच १५-बीएच १२९८) हिच्यावरदेखील पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, बाहेर कशाचा तरी आवाज येत असल्याने प्रसाद राय यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना त्यांची रिक्षा जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला व शेजारी राहणारे ठाकरे यांनाही त्यांची दुचाकी जळत असल्याचे सांगितले. यानंतर अग्निशामक दल व पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहचून दोन्ही गाड्या पोलीस स्टेशनमध्ये आणल्या. गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात गुंडगिरी वाढली असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सिडको तसेच परिसरातील गुंडांच्या मुसक्या आवळण्याची कारवाई करण्याची मागणीही सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
सिडकोत पुन्हा गाड्यांची जाळपोळ; नागरिकांत भीतीचे वातावरण
By admin | Updated: October 31, 2015 23:20 IST