ओझरला प्रभागरचनेचा विचारही नाही.
ओझर : यावर्षी १८ फेब्रुवारी रोजी नव्याने अमलात आलेल्या ओझर नगरपरिषदेला सुरुवातीच्या काही महिन्यांचा काळ सोडला तर न्यायप्रविष्ठ बाबींनी वेढा मारला होता. दिलीप मेनकर यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर कामकाजाला सुरुवात झाली असता एका याचिकेमुळे ग्रामपंचायत की नगरपरिषद या कचाट्यात गावकरी होते. प्रभाग रचना, एकूण वाॅर्ड या बाबींना अद्याप पावेतो सुरुवात झालेली नाही. प्राथमिकदृष्ट्या प्रशासक म्हणून कामकाजाला सुरुवात झालेली आहे. आता काही दिवसांनी तो तिढा सुटण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. किती प्रभाग होणार, एकूण जागा किती ही प्रक्रिया अद्याप बाकी असून कामकाज सुरळीत झाल्यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
--------------------------------
येवल्यात प्रतिष्ठेची लढत शक्य
येवला : येथील नगरपालिकेसाठी नोव्हेंबर-२०१६ मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात चुरस होऊन नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे बंडू क्षिरसागर विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषाताई शिंदे यांना हार मानावी लागली होती. बारा प्रभागातून २४ उमेदवार निवडून देण्यासाठी या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेत दहा जागांवर विजय संपादन केला. तर त्याखालोखाल शिवसेनेने पाच जागांवर आपले नगरसेवक निवडून आणले. भाजपाने चार जागांवर विजय संपादन केला होता. पाच जागांवर अपक्ष नगरसेवक निवडून आले. एकूणच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपद हुकले असले तरी सर्वात जास्त दहा जागांवर नगरसेवक निवडून आले. यावेळेस नगराध्यक्षपद नगरसेवकातून असून प्रभाग संख्या व नगरसेवक संख्या तीच असल्याने नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण होणार आहे.