नाशिक : रेशनमधून स्वस्त दरात दिल्या जाणाऱ्या तूर डाळीच्या दर्जाविषयी प्रारंभी नाके मुरडणा-या ग्राहकांनी डाळीची किंमत कमी होताच रेशनमधून डाळ घेण्यासाठी रिघ लावल्याने आॅगस्ट महिन्यात पुरवठा खात्याने तूर डाळीची मागणी १० हजार क्विंटलने वाढविली आहे. शासनाने आधारभूत किमतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर तूरखरेदी केली असल्याने सध्या पणन महामंडळाकडे लाखो क्विंटल डाळ पडून असल्यामुळे तिची रेशनमधून विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या डाळीची विक्री केली जात असली तरी, प्रारंभी सरकारने ५५ रुपये किलो या दराने तूर डाळीची किंमत ठरविली होती. खुल्या बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळीची किंमत ६० ते ६५ रुपये असताना रेशनमधील दुय्यम दर्जाची डाळ घेण्यास ग्राहकांनी नकार दिला होता. त्यामुळे तूर डाळ पडून राहण्याच्या भीतीने शासनाने डाळीची किंमत कमी करून ३५ रुपये दराने विक्री करण्याचे ठरविले.
रेशनच्या तूर डाळीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:04 IST