पंचवटी : विवाह सोहळ्यात पाहुणा म्हणून येऊन चोरी करणाऱ्या बुधवार पेठेतील राजेंद्र नामदेव जाधव या संशयिताला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जाधव हा महामार्गावरील एका मंगल कार्यालयात चोरीसाठी आला असता पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली. जाधव हा विवाह समारंभात जाऊन पाहुणा असल्याचे भासवून वधू व वर कक्षांच्या खोलीत जाऊन तेथील वऱ्हाडींची नजर चुकवून बॅगमधून सोन्याचांदीचे दागिने तसेच रोकड चोरी करायचा. आडगाव शिवारातील मंगल कार्यालय व लॉन्समध्ये अशाच प्रकारे अनेक चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने जाधव याचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून, पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. (वार्ताहर)