कळवण : मिणमिणत्या पणत्यांचा प्रकाश, रंगीबेरंगी आकाशकंदीलांची सजावट, प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी या शुभ वातावरणात शहरातील शिवाजीनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी सूरसुरी ओवाळत दिवाळीचे अनोखे सेलिब्रेशन करत स्वागत केले. मनामनातील मरगळ झटकत अंधारावर प्रकाशाने आणि निराशेवर आशेने विजय मिळवण्याचा सण म्हणजे दिवाळी. यासणानिमित्त विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्याने आज शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात विद्यार्थिनींनी दिवाळी साजरी करत या सणाचा आणि सुट्टी लागल्याचा आनंद साजरा केला. शाळेच्या अंतर्गत भागात रंगीबेरंगी आकाशदिव्यांची सजावट करण्यात आली होती, तर ठिकठिकाणी पणत्या लावण्यात आल्या होत्या. शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. विद्यार्थिनींनी उत्साहाने पाऊस, भुईचक्कर, सुरसुरी लावून दिवाळीचे स्वागत केले. यावेळी केंद्रप्रमुख निशादेवी गिरी, शाळेचे मुख्याध्यापक रमेश सोनवणे, शिक्षक पुष्पलता देवरे, यमुना पवार, सुरेखा पवार, ज्योतीमाला देशमुख, योगीता अहेर, कल्याणी देवरे, अलका शेवाळे, मनीषा वाघ, प्रतिभा पवार, वैशाली रौंदळ आदिंसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (वार्ताहर)
चिमुकल्यांची दिवाळी
By admin | Updated: October 22, 2016 23:11 IST