नाशिक : जुना गंगापूर नाक्याकडून इंद्रप्रस्थ पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील चोपडा लॉन्स चौफुली आता धोकादायक ठरत असून, परिसरातील मुलांना उद्यानात जाताना किंवा येताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. या चौकात सिग्नल बसवावा किंवा गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.जुना गंगापूर नाक्यावर होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक शाखेने या नाक्यावर सिग्नल बसविल्याने आता येथील वाहतूक नियंत्रित झाली आहे. परंतु तेथून इंद्रप्रस्थ पुलाकडे जाणारी वाहतूक आणि पुलावरून गंगापूररोडकडे येणारी वाहतूक वाढली आहे. त्यातच चोपडा लॉन्सजवळ प्रमोद महाजन उद्यानाकडे एक मार्ग आणि दुसरा पंपिंग स्टेशनकडे जात असल्याने ही चौफुली अत्यंत वर्दळीची झाली आहे. प्रमोद महाजन उद्यानाकडे जाणाऱ्या किंवा येणाऱ्यांना मुख्य मार्गावरील वर्दळीमुळे रस्ता ओलांडणे कठीण होते. वाहनचालकांची जशी अडचण होते तशी उद्यानात येणाऱ्या जाणाऱ्या बालकांची होते. दिवसागणिक या चौफुलीवर छोटे अपघात होत असतात. चोपडा लॉन्समध्ये विवाह सोहळा असला तर अनेक नागरिक याच परिसरात मोटारी उभ्या करून जातात. अशा वेळी तर परिस्थिती आणखी बिकट होेते. मनपाने या चौफुलीवरील वाहतुकीचे नियोजन करावे आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी किंवा गतिरोधक बसवावेत, ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावेल आणि अपघात टळू शकतील, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
बालकांना धरावा लागतो जीव मुठीत
By admin | Updated: July 23, 2016 01:29 IST