माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना चाचणी करून शाळेत जाण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षकांनी झोडगे येथे आरटीपीसीआर चाचणी केली असता संबंधित शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चिखलओहोळ येथील आरोग्य अधिकारी श्रीमती तडवी व सहकारी यांनी तात्काळ चव्हाण यांच्याशी संपर्क साधला व त्यांना घरीच अलगीकरणात ठेवून कोरोना औषधी दिल्या. दररोज ऑक्सिजन पातळी व तापमान घेणार असल्याचे सांगितले. शाळा नियमानुसार १४ दिवस बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जे विद्यार्थी शाळेत आले असतील त्यांचीही त्वरित कोरोना चाचणी करण्यात यावी. चिखलओहोळ आरोग्य केंद्र याबाबत लवकर चाचणी कॅम्प घेईल, असे आश्वासन दिले आहे. चव्हाण यांना अगोदरच नाकाचे हाड वाढल्यामुळे श्वासोच्छ्वासास अडचण असून धुळीची ॲलर्जी असल्याने कोरोनामुळे चिंतेत भर पडली आहे.
कोरोना अजून समूळ नष्ट झालेला नाही. पालक वर्गाचा शाळा चालू करण्याचा आग्रह अंगाशी येऊ शकतो. शासनाने आठवी ते दहावीपर्यंतची शाळा चालू करण्याचा आदेश दिला असला तरी अजून बऱ्याच शिक्षकांचे लसीकरण झाले नसून शासनाने त्वरित शिक्षक वर्गासाठी लसीकरणाचा वेगळा कोटा द्यावा, अशी तालुक्यातील शिक्षकांची मागणी आहे. तसेच विद्यार्थी लसीकरण गरजेचे असून त्याशिवाय शाळा सुरू करणे धोक्याची घंटा ठरू शकते.
शाळा चालू करण्याबाबत शासनाने सर्वांगीण विचार करूनच निर्णय घ्यावा. शाळेत पन्नास टक्के शिक्षक हजेरी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यातील काही शाळा शंभर टक्के हजर राहण्याची सक्ती करीत असल्याचे गाऱ्हाणे अनेक वेळा शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी यांच्या दरबारी केले आहे. कोरोना गांभीर्य दक्षता घेता वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व शैक्षणिक विभागाशी विचारविनिमय करून शाळा १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून परिसरातील सर्व पालक, विद्यार्थी यांनी खबरदारी म्हणून गावातील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करून घ्यावी.
कोट...
अशी घटना घडल्यास शाळा किती दिवस बंद ठेवाव्यात याविषयी संभ्रम दिसून येतो. सरकारी आदेशानुसार एक महिना तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनुसार १५ दिवस याबाबत शासनाने निश्चित असा कालावधी ठरवून द्यावा, जेणेकरून संभ्रम निर्माण होणार नाही.
- एस.एस. तडवी, आरोग्य सेविका, चिखलओहोळ
कोट...
सर्व शिक्षकांनी काळजी घेऊन कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. पंचक्रोशीतील पालकांनी ही विद्यार्थी तब्येतीची काळजी घ्यावी, कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच गावातच कोरोना चाचणी कॅम्प आयोजित केला जाईल, याची नागरिकांनी दखल घ्यावी.
- एच. टी. देसाई, मुख्याध्यापक