नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दिवसभरासाठी नाशिक भेटीवर येत असून, त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या एकूणच नियोजनाविषयी साधु-महंतांनी जाहीर नाराजी प्रकट केल्याने फडणवीस त्यांची भेट घेऊन म्हणणेही जाणून घेणार आहेत. सकाळी दहा वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री थेट त्र्यंबकेश्वर येथे भेट देणार असून, तेथे रेणुका मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या कामांची आढावा बैठक होईल. त्यानंतर अकरा वाजता ते नाशिकला दाखल होतील त्यांच्या हस्ते नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले जाईल. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक दुपारी १२ वाजता नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात होईल. याच ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या सिंहस्थ कुंभमेळा वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दुपारी तीन वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या धर्मपाल समग्र साहित्य मराठी द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते होईल व पाच वाजता भोसला स्कूल येथे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या हिंदी चरित्र खंडाचे प्रकाशनही त्यांच्याच हस्ते केले जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता ओझर विमानतळावरून विशेष विमानाने ते नागपूरला रवाना होतील.
मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात सिंहस्थ बैठक : साधु-महंतांची भेट
By admin | Updated: February 21, 2015 01:24 IST