पेठ : तळपते ऊन.. तापलेले रस्ते.. पेठ शहराचा भरलेला बाजार या सर्व गोष्टींना छेद करीत ढोलकीच्या तालावर अपंगत्वावर मात करत स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारून एकेक रु पया जमा करणाऱ्या पोतराजाची जगण्याची परवड कधी दूर होईल, असा सवाल उभा ठाकतो.आपल्या नशिबी आलेल्या दारिद्र्य, अपंगत्व अथवा आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना अनेकजण खचलेले आपणास दिसून येतात. मात्र अशोक तेलगू हा साधारण ३५ वर्षांचा दिव्यांग युवक दारिद्र्यात खितपत पडलेल्या आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ लावून, टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने चाबूक हाती घेतला. रंगीबेरंगी चिंध्या, कंबरेला व पायात घुंगरू, मळवट भरून एका पायाने अपंग असतानाही गावोगावी भर उन्हात पत्नी वाजवत असलेल्या ढोलच्या तालावर गिरक्या घेत स्वत:ला चाबकाचे फटके मारून एक-दोन रु पये जमा करतात. अतिशय खडतर परिस्थितीत अपंगत्वावर मात करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या अशोकने शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन किमान निवासापुरते घर व लेकरा-बाळांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी माफक अपेक्षा व्यक्त करताना सरकारने आम्हाला आजवर काय दिले, असा प्रश्न विचारून अशोकने सर्वच बघ्यांना निरुत्तर केले. (वार्ताहर)
पायाला चटके नि अंगाला फटके
By admin | Updated: January 7, 2017 00:35 IST