साहेबराव अहिरे : पाथर्डीप्रभाग क्रमांक ३१ मध्ये असलेले पारंपरिक उमेदवार आणि अपक्षांचा नवा चेहरा यामुळे येथील प्रभागात चुरस निर्माण झाली आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे समीकरण बदलत असल्याने मतविभागाचा फायदा कुणाला होतो यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. सुरु वातीस सर्वच जागांवर दुरंगी लढत होईल, असे वाटत असताना आता मात्र सर्व चारही जागांवर लढती होतील हे चित्र आहे. पुरुष सर्वसाधारण जागेवर पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्येच लढत वाटत होती. आता मात्र काहीसी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांनी लढतीच्या निकालाची अनिश्चितता अधोरेखित केली आहे. मुख्य लढत मात्र भाजपा शिवसेनेतच होणार आहे. पुरु ष सर्वसाधारण जागेवर (ड गट) गेल्यावेळी मुख्य स्पर्धक शिवसेनेचे माजी उपमहानगरप्रमुख सुदाम डेमसे आणि भाजपाचे सुदाम कोंबडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. डेमसे शिवसेनेचे एकनिष्ठ, गेल्यावेळच्या अल्पशा मतांनी झालेल्या पराभवाच्या सहानुभूतीच्या लाटेवर, पाथर्डीकरांच्या एकगठ्ठा मतांच्या आधारावर ते विजयाचे गणित मांडत आहेत. दुसरीकडे मनसेतून भाजपात गेलेल्या सुदाम कोंबडे यांना त्यांचे पारंपरिक मते आणि भाजपाच्या मतांचा आधार लाभला आहे. असे असले तरी नगरसेवक कोंबडे यांना चुरशीची लढत लढावी लागणारआहे. याशिवाय याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकृष्ण वारुंगसे आणि मनसेकडून भाऊसाहेब तुंगार आरपीआयचे शंकर भदरंगे मैदानात उतरले आहेत. भाजपाचे नाराज संजय गायकवाड व अपक्ष समीर निमोणकर यांनीही अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने ते फाइट देतात की निकालच बदलवतात हा प्रभागात चर्चेचा विषय आहे. महिला सर्वसाधारण (क गट) जागेवरदेखील तिरंगी अन् काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवार अनिता डेमसे सेनेच्या मतांना सुरूंग लावू शकतात. भाजपाच्या नेहा म्हैसपूरकर यांचे शिवसेनेच्या संगीता जाधव व मनसेच्या अर्चना जाधव यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले अमोल जाधव यांच्या पत्नी असलेल्या संगीता जाधव यांची उमेदवारी अमोल जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. मनसेच्या अर्चना जाधव यांनी केलेल्या कामावर दावेदारी केलीआहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ब गट) येथेही भाजपाच्या पुष्पा आव्हाड आणि शिवसेनेच्या जयश्री जाधव यांच्यासमोर अपक्ष शुक्रवंती वसंत पाटील, मनसेचे कार्यकर्ते अजय दहिया यांच्या मातोश्री सुमन खेतमल दहिया यांच्यामुळे ही लढत चौरंगी होताना दिसते. मीना गांगुर्डे यांची भाजपाने दखल न घेतल्याने त्या काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत. त्यांचा प्रभावही अडचणीचा ठरू शकतो. अनुसूचित जाती राखीव (अ गट) जागेवर शिवसेनेच्या वंदना बिरारी, भाजपाचे भगवान दोंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कोथमिरे यांच्यात लढत होऊ शकते. याच जागेवर मनसेकडून ज्योती गायकवाड, बसपाच्या शारदा दोंदे शिवसेनेवर नाराज होऊन अपक्ष उमेदवारी करीत असलेल्या शोभा दोंदे, भाकपाचे अमर चंद्रमारे आणि अपक्ष हेमंत गायकवाड हेही रिंगणात आहेत. तुल्यबल उमेदवारांमुळे सर्वच गटांत कोणत्याही एका पॅनलच्या सर्वच उमेदवारांना एकतर्फी मतदान होण्याची शक्यता अजिबातच नाही.
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना नवख्यांचेही आव्हान
By admin | Published: February 18, 2017 12:06 AM