नाशिक : शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये खुलेआम सोनसाखळी दुचाकीचोरी, लूटमारसह धाडसी घरफोड्यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचवटी, अमृतधाम, द्वारका परिसरात घरफोड्यांच्या घटना घडल्याचे उघडकीस आले होते. तोच पुन्हा गेल्या बुधवारी (दि.७) दिंडोरीरोडवरील बंद घर चोरट्यांनी फोडून तीन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. दिंडोरीरोडवरील किशोर प्लाझा येथे बंद घराचे कुलूप तोडून लुटारुंनी सोन्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे तीन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी कविता चोरडिया यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसऱ्या घटनेत सुमारे एक लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. एकूणच बुधवारी पंचवटी परिसरात दोन घरफोड्यांच्या घटनेत एकूण चार लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडकरी चौकातील राहुल रिजेन्सीमधील बंद घर चोरट्यांनी फोडून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उज्ज्वला प्रफुल्ला चोरडिया यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तीनही घटनांचे मिळून एकूण पाच लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला गेला आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन चौकातील सीमा अपार्टमेंटमध्ये घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साठ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे एक ते सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. पंचवटी परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरात घरफोड्यांची मालिका पोलिसांपुढे आव्हान
By admin | Updated: October 9, 2015 01:08 IST