नाशिक : तालुक्यातील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेचे राजकारण चांगलेच तापले असून, गेल्या आठवड्यात संस्थेचे अध्यक्ष दिनकर पाटील व उपाध्यक्ष हिरामण बेंडकुळी यांच्या विरोधात अकरा संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केलेला असतानाच, गेल्या आठवड्यातच संस्थेच्या संचालक मंडळाच्या तीन बैठका बोलावून या बैठकांना संचालक गैरहजर राहण्याच्या निमित्ताने दिनकर पाटील यांनी संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस करून कुरघोडी केली आहे. जिल्हा निबंधकाच्या दरबारी हा वाद पोहोचला असून, परस्परविरोधी दाव्यांमुळे पेच आणखीच वाढला आहे. मनमानी कारभार व तीस लाखांच्या खर्चाच्या मुद्द्यावरून अकरा संचालकांनी गेल्या आठवड्यातच दिनकर पाटील व हिरामण बेंडकुळी यांच्या विरोधात जिल्हा निबंधकांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. या वर अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच, पाटील यांनी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची बैठक बोलाविली व या बैठकीचे पत्र तसेच विषय पत्रिकाही संचालक मंडळाला वेळेत पाठविल्या होत्या. तथापि, या सभेस अध्यक्ष, उपाध्यक्षासह दौलतराव पाटील, मधुकर खांडबहाले, पुंजा थेटे, शीला पाटील असे सहा संचालक व कार्यकारी संचालक एस. पी. कदम हे हजर होते, परंतु गणपूर्तीअभावी सदरची सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ४ मार्च रोजी तहकूब सभा बोलाविण्यात आली असता, या बैठकीस फक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक असे तिघेच उपस्थित राहिल्याने ही सभाही तहकूब करण्यात आली. पुन्हा संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली असता या बैठकीस अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तानाजी पिंगळे, दौलतराव पाटील, कार्यकारी संचालक कदम हे तिघेच उपस्थित होते, अन्य संचालकांनी बहिष्कार टाकला.
सेंट्रल गोदावरीचे राजकारण पेटले
By admin | Updated: March 9, 2017 02:00 IST