गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या गावांतील पोलीस पाटील, डीजे चालक-मालक, तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी आदींची पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक पार पडली. नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, एपीआय गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडिवऱ्हे येथील इंदुमती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार, नियमांचे पालन करीत गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन उपस्थित असलेल्या पदाधिकारी व गणेश मंडळांचे अध्यक्ष यांना केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवासह इतर सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.