‘थम्ब’ केल्यानंतर उघडणार सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा दरवाजा ! नाशिक : पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात संपूर्ण शहर नजरबंद झाल्यानंतर या नियंत्रण कक्षाच्या सुरक्षिततेबाबतही पोलीस प्रशासनाने तितकीच काळजी घेतली आहे़ नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या थम्ब इंप्रेशननंतरच या कक्षाचा दरवाजा उघडला जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़ सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांचे संपूर्ण शहरावर लक्ष असणार आहे़ यासाठी पोलिसांनी शहराचे केलेले सात सेक्टर व या सेक्टरवर लावण्यात आलेल्या कॅमेरांनुसार नियंत्रण कक्षाचेही विभाजन करण्यात आले आहे़ त्यामध्ये दिंडोरी, मुंबई, त्र्यंबकेश्वर, पेठ, शाही मार्ग, धुळे, साधुग्राम, औरंगाबाद, पुणे, रेल्वेस्टेशन असे वेगवेगळे सेक्टर तयार करण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणाहून येणाऱ्या सीसीटीव्हीच्या फुटेजवर एक अधिकारी व दोन कर्मचारी नियंत्रण ठेवणार आहे़ अशा प्रकारचे दहा सेक्टर नियंत्रण कक्षात आहेत़या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागेच सहा वायरलेस सेट व कर्मचारी असणार आहेत़ त्याचीही विभागणी सेक्टरप्रमाणेच करण्यात आली असून, संबंधित सेक्टरवरील पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचे काम नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे़ शहरातील प्रमुख मार्गांवर लावण्यात आलेल्या पब्लिक अॅड्रेस सिस्टिम अर्थात कर्णावर नागरिकांना सूचना देण्यासाठी सहा कर्मचाऱ्यांची वायरलेस अधिकाऱ्यांच्या पाठीमागे व्यवस्था करण्यात आली आहे़ या ठिकाणाहून वेगवेगळ्या सेक्टरवर सूचना देता येणार आहेत. नियंत्रण कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण, तसेच सूचना देण्यासाठी कक्षात चार प्रमुख अधिकारी असणार आहे़ (प्रतिनिधी)
‘थम्ब’ केल्यानंतर उघडणार सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचा दरवाजा !
By admin | Updated: July 31, 2015 23:26 IST