चमनोज मालपाणी ल्ल नाशिकरोडरेल्वे आरक्षण कार्यालयात एजंट, दलाल व इतरांमुळे होणारा रेल्वे आरक्षणाचा गैरकारभार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे वर्षभरापूर्वी भुसावळ रेल्वे मंडलाकडे दिलेला प्रस्ताव अद्याप धूळ खात पडून आहे. त्यामुळे रेल्वे आरक्षण कार्यालयात होणाऱ्या गैरकारभाराला एकप्रकारे मदतच होत आहे.रेल्वे आरक्षण कार्यालयात दलाल, एजंट व इतरांमुळे होणारा रेल्वे आरक्षणाचा गैरकारभार रोखण्यासाठी २०१४ मध्ये देशातील सर्व रेल्वे आरक्षण कार्यालय सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली नजरकैद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर देशातील अनेक रेल्वे आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. रेल्वे भुसावळ मंडल विभागामध्ये अद्याप बहुतांश ठिकाणी आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकरोड रेल्वे वाणिज्य विभाग, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे टेलिकॉम या तीनही विभागाने संयुक्तरीत्या पाहणी करून वर्षभरापूर्वी दिलेला प्रस्ताव तसाच धूळ खात पडून असल्याने रेल्वे आरक्षण कार्यालय व तेथे होणारा गैरकारभार नजरकैद होण्यास अडचण निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरक्षण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर नजर ठेवणेदेखील सोपे होणार होते. तसेच दररोज विशिष्ट व्यक्ती आरक्षण कार्यालयात येत असेल तर रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाला कारवाई करणे सोपे होणार होते.त्यामुळे काही प्रमाणात एजंट व दलालांवर त्याचा परिणाम झाला असता. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित न होऊ देण्यामागे कोणाचे हित असेल याबाबत मात्र प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चेचा सूर ऐकायला मिळत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप कागदावर
By admin | Updated: May 1, 2017 01:36 IST