वडांगळी : उपक्रमशीलतेबरोबरच गुणवत्तेबाबतही अग्रेसर असलेल्या वडांगळी विद्यालयाच्या लौकिकात नववर्षारंभी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे मोलाची भर पडली आहे. या सुविधेमुळे विद्यालयात शिस्त व सुरक्षा राखण्यास मोठी मदत मिळणार आहे.वडांगळी येथे मराठा विद्याप्रसारक समाजाच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शैक्षणिक संकुलात पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक कला-विज्ञान आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र मिळून सुमारे दोन हजार दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आगामी शैक्षणिक वर्षात प्राथमिक विभाग व वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणे प्रस्तावित आहे. विद्यालयाची वाढती विद्यार्थी संख्या, पालक व पाहुणे यांची सततची ये-जा, शेजारीच असलेल्या सतीमाता देवस्थानामध्ये येणारे भाविक, शाळेसमोरून जाणारा महामार्ग यामुळे विद्यालयाच्या प्रांगणात व परिसरात सतत वर्दळ असते. त्याचबरोबर शाळेच्या बसेस, शिक्षक व विद्यार्थी यांची वाहने, शालेय मालमत्ता, वृक्षसंपदा, पाणी व्यवस्था आदिंची सुरक्षा ठेवण्यासाठी व शिस्त राखण्यास मदत मिळण्यासाठी आधुनिक निगराणीची गरज व्यक्त होत होती. ही गरज ओळखून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व व्यावसायिक विक्रम माधव खुळे आणि त्यांचे सहकारी नितीन सुधाकर मोगल, संतोष रामचंद्र देवकर, राजेंद्र शंकर राजोळे, ज्ञानेश्वर सजन रोडे, अनिल अंकुश जोगदंड यांनी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक निधी देऊन विद्यालयाच्या प्रांगणात पाच कॅमेरे बसवून दिले आहेत. त्याद्वारे संपूर्ण विद्यालय परिसराची निगराणी केली जात आहे. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे संस्थापक शिवाजी खुळे, नितीन अढांगळे, आर. जे. थोरात, आर. डी. गिते, शालेय समिती अध्यक्ष सुदेश खुळे, रंगनाथ खुळे व राजेंद्र भावसार यांच्या प्रेरणेने देणगीदारांनी हा उपक्रम यशस्वी केला. विक्रम खुळे व सहकाऱ्यांनी विद्यालयाला दिलेल्या या अनमोल भेटीचे संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, संचालक कृष्णाजी भगत यांनी कौतुक केले आहे. वडांगळीच्या सरपंच सुनीता सैंद, पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन अढांगळे, दिनकर खुळे, रंगनाथ खुळे, प्राचार्य शरद रत्नाकर, पर्यवेक्षक गुलाब सय्यद यांच्या हस्ते देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. आर. के. तांबे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
By admin | Updated: January 5, 2016 23:12 IST