नाशिक : शहर धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी व एजंटानी घातलेल्या विळख्याच्या पार्श्वभूमीवर पैसे घेऊन शिधापत्रिका देणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतला असून, गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिधापत्रिकाधारकांसाठी सुमारे दीड हजार रेशन कार्डे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिधापत्रिकाधारकांची ससेहोलपट या सदराखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी धान्य वितरण कार्यालयाकडून माहिती मागविली असता, जवळपास आठ ते दहा महिन्यांपासून नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आलेले नसल्याचे निदर्शनास आले. सेतू कार्यालयाकडून अर्ज गहाळ झाल्याचे, तर वाटप करण्यासाठी कार्डेच शिल्लक नसल्याचेही कारण देण्यात आले. या कार्यालयाला घातलेल्या एजंटांचा विळखा सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचना दिल्या. त्याच बरोबर ज्या नागरिकांकडून शिधापत्रिकेसाठी पैसे घेतले असतील त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले. धान्य वितरण कार्यालयातील कर्मचारी, सेतू कर्मचारी व एजंट यांची साखळी तयार होऊन सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. या संदर्भात वेळोवेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असून, ‘दाम करी काम’ अशा पद्धतीने कामे केली जात असल्यामुळे आठ ते दहा महिन्यांपासून शिधापत्रिकांचे वाटपच केले जात नसल्याने साहजिकच कंटाळलेल्या नागरिकांनी एजंटांना जवळ केल्याने फक्त एजंटांचीच कामे होत आहेत. बुधवारी या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्यानंतर धान्य वितरण कार्यालयात रेशन कार्डे शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आल्यानंतर कळवण येथून दीड हजार कार्डे मागविण्यात आली. ज्या ज्या नागरिकांनी अर्ज केला आहे अशांची यादी तयार करून ती नोटीस फलकावर लावण्याचे व येत्या आठ दिवसांत दीड हजार रेशन कार्डे तयार करून ती वाटप करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
शिधापत्रिका एजंटांवर गुन्हे दाखल करणार
By admin | Updated: November 13, 2014 00:22 IST