नाशिक : मुंबईला जाणाऱ्या टोयोटा इटॉस कारने इगतपुरीजवळ दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील परखतपूर येथील सागर रमेश खांडगे (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला़ तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये परखतपूरचे सरपंच राजेंद्र वाक्चौरे यांचाही समावेश आहे़ मंगळवारी (दि़२३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ अकोले तालुक्यातील परखतपूर येथील योगी केशवमहाराज चौधरी (रा़वीरगाव, ता़अकोले, जि़अहमदनगर), राजेंद्र वाकचौरे (सरपंच, रा़ परखतपूर, ता़अकोले), बाळासाहेब वाकचौरे (रा़परखतपूर) व सागर खांडगे (२२,रा़परखतपूर) हे चौघे टोयोटा इटॉस कारने (क्रमांक - एम़एच़१७ एजे - ३८५७) मुंबईला रुग्णास पाहण्यासाठी जात होते़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घोटी गावाच्या पुढे पिंप्री फाट्याजवळ कारने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारमधील हे चौघेही गंभीर जखमी झाले़ या जखमींना १०८ अॅम्ब्युलन्समधील डॉ़मनोज जगताप यांनी तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले़; मात्र सागर खांडगेची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तर गंभीर जखमी असलेले राजेंद्र वाकचौरे व योगी केशवमहाराज चौधरी यांच्यावर पाथर्डी फाट्यावरील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ दरम्यान या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
इगतपुरीजवळ कारची दुभाजकाला धडक ; एक ठार
By admin | Updated: June 24, 2015 01:44 IST