निफाड : महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळामध्ये वाहतूक नियंत्रक पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार वाहकांसाठी बढती परीक्षा घेण्याचे नियोजन चालू असले तरी महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या वाहतूक नियंत्रकांच्या पदावर परीवहन मंडळाकडून संबंधित डेपोतील वाहकांना सेवा ज्येष्ठतेनुसार काम पाहण्याचे सांगण्यात आले आहे किंवा त्यांचा वापर करून घेतला जात आहे. अशा वाहकांना सेवा ज्येष्ठतेनुसार सदर होऊ घातलेल्या वाहतूक नियंत्रक पदाच्या परीक्षेतून सूट द्यावी. शिवाय या वाहकांना वाहतूक नियंत्रक पदावर कायम करावे, अशी मागणी राज्यातील वाहकांनी केली आहे.पाच वर्षांत परीवहन मंडळातील जे वाहतूक नियंत्रक सेवानिवृत्त झाले त्यातील बहुतांशी जागा भरल्या गेल्या नाहीत, अशी चर्चा आहे. जिल्ह्यात किमान अशा या रिक्त जागांवर मंडळाने नवीन भरती न केल्याने संबंधित त्या त्या डेपोतील वाहकांना सेवा ज्येष्ठतेनुसार त्या वाहतूक नियंत्रक पदावर बळजबरीने काम करण्यास सांगितले. नाशिक जिल्ह्यात असे काम करणारे वाहक (कंडक्टर) यांची संख्या ८० ते १०० असावी. वाहकांनी (कडंक्टर) पगार वाहक पदाचा घ्यायचा मात्र काम वाहतूक नियंत्रक पदाचे करायचे. शिवाय वाहतूक नियंत्रक म्हणून काम करताना संपूर्ण बसस्थानकांची सर्वच जबाबदारी पेलायची, कागदपत्रांचे सर्व व्यवहार सांभाळायचे, दिवसभर स्थानकात आलेल्या बसेसच्या नोंदी करायच्या आर्थिक व्यवहार सांभाळायचे. ही सर्व जबाबदारीची कामे करताना बसस्थानवरील छोट्या-मोठ्या तक्रारी निवरता निवरता वाहकांच्या नाकीनव येतात.वाहतूक नियंत्रक पदासाठी बढती परीक्षा झाली तर या परीक्षेला सेवा ज्येष्ठतेनुसार वाहकांना बसता येईल. मात्र ज्या वाहकांनी वाहतूक नियंत्रकपदाचे काम तळमळीने, निष्ठेने, आर्थिक फटका सोसून केले किंवा करीत आहे. त्या वाहकांना या बढती परीक्षेतून वगळावे व त्यांनी जी दोन ते पाच वर्षे वाहतूक नियंत्रक म्हणून निस्वार्थी भावनेने सेवा केली. त्याचे फलित म्हणून त्या वाहकांना या पदावर कायम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
वाहकांना बढती परीक्षेतून वगळावे
By admin | Updated: November 24, 2015 22:55 IST