अंदरसूल : संपूर्ण येवला तालुक्यात मकर संक्रांत निमित्ताने पतंग उडविले जातात. महारष्ट्रात येवला शहर आणि तालुका पतंगबाजीसाठी प्रसिद्ध आहे परंतु पतंग शौकिनांकडून आपली पतंग लवकर कटू नये यासाठी साध्या सुतवलेल्या मांजाऐवजी नायलॉन मांजाचा वापर सर्रास होताना दिसत असतो. या नायलॉन मांजामुळे प्रामुख्याने पक्षी, दुचाकीस्वारांना गळ्याला इजा होऊन गंभीर स्वरुपाची दुखापत होत असते. काहींना तर आपला जीव गमावण्याची वेळ नायलॉन मांजामुळे आली होती. मागील वर्षी अनेक पक्षी मांजा गळ्यात अडकून मृत्युमुखी पडल्याचे हृदय पिळून टाकणारे चित्र पाहायला मिळाले होते. येवला शहराबरोबर नायलॉन मांजाचे लोण ग्रामीण भागातदेखील पाहायला मिळत आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापर बंदी असतानादेखील त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाबरोबर पोलिसांनी सूचना देऊनदेखील नायलॉन मांजाची विक्र ी आणि वापर सर्वत्र होत असतो. या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांबरोबर तालुका पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून मांजा विक्रेत्यांना सीआरपीसी च्या कलम १४९ प्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावूनदेखील एखादा विक्रेता नायलॉन मांजा विक्री करताना निदर्शनास आल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांनी नोटीसमार्फत कळविले आहे़
नायलॉन मांजाविरोधात मोहीम
By admin | Updated: January 9, 2016 22:51 IST