मनमाड : मालेगाव रोडवर पहाटेच्या सुमारास काडीपेटीचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. तत्पूर्वी याच मार्गावर इंधन वाहून नेणारा टॅँकर पलटी होऊन इंधन गळती सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे अग्निशमन दल तसेच नागरिकांची एकच धावपळ उडाली.मालेगाव महामार्गावरील दहेगाव शिवारात असलेल्या पेट्रोलपंपासमोर (टीएन १९ यू ४१३५) हा ट्रक आरती, एक्का आणि जोडी या तीन कंपन्यांच्या काडीपेटीचे बॉक्स घेऊन तामिळनाडू येथून उत्तर प्रदेशकडे जात असताना ट्रकने अचानक पेट घेतला. मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जॉर्ज स्वामी, विलास हुकिरे, जयदेव मगर, रवींद्र कोंडूरकर व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात पथकाला यश आले. या आगीत काडीपेटी बॉक्ससह ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. (वार्ताहर)
द बर्निंग ट्रक
By admin | Updated: March 16, 2017 23:19 IST