नाशिक : भद्रकाली परिसरातील गंजमाळ, पंचशीलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील एका घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना मंगळवारी (दि. २१) घडली असून या प्रकरणी बुधवारी (दि. २२) भद्रकाली पोलीस ठाण्यात आशा अशोक सावंत (४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशीलनगर येथील घर नंबर ७४ च्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत सुमारे ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात ३० हजार रुपये किमतीची एक सोन्याची मोहन माळ, ३० हजार रुपयांची एक अष्टपावली सोन्याची माळ, १८ हजार रुपयांच्या दोन सोनसाखळ्या, दीड हजार रुपयांची मुरनी, दीड हजार रुपयांचे चांदीचे दोन कडे व पाच हजार रुपयांच्या चांदीच्या दोन जोडव्या असा एकूण ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आशा अशोक सावंत यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.