मालेगाव : शहर स्वच्छतेवर भर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सार्वजनिक शौचालये, उत्पन्नवाढीसाठी मालमत्तांचे सर्वेक्षण, हजेरी केंद्रांच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद व कुठलीही कर वाढ न करता गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असलेले ३७८.९९ कोटींचे अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने आज स्थायी समितीला सादर केले. स्थायी समितीने यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि. २८) ४ वाजेपर्यंत अंदाजपत्रकीय सभा तहकूब केली आहे. स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा व दुरुस्ती सुचवत महासभेला अंतिम अंदाजपत्रक सादर करणार आहे.मनपा प्रशासनाने मनपा आयुक्त रवींद्र जगताप, लेखाधिकारी कमरुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१७-१८चे अंदाजपत्रक तयार केले आहे. सदरचे अंदाजपत्रक सोमवारी येथील स्थायी समिती सभापती एजाज बेग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सादर करण्यात आले. मनपा प्रशासनाने गेल्या वर्षी ४५२.७४ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अंदाजपत्रकात कपात करण्यात आली आहे. प्रशासनाने फुगीर अंदाजपत्रक न सादर करता केवळ ३७८.९९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. सन २०१७-१८मध्ये महसुली उत्पन्न १७२.८१ कोटी धरण्यात आले आहे तर प्रमुख बाबींवरचा खर्च १४०.९४ कोटी एवढा गृहीत धरण्यात आला आहे. म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेसाठी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. मनपाच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी यासाठी शहरातील विविध ठिकाणी बांधा-वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच म्हाळदे शिवारात घनकचरा व्यवस्थापनासाठी नदीकिनारी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी १४ वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्यात आली आहे. शहर स्वच्छतेवर विशेष भर देण्यासाठी कचरा कुंड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. हगणदारीमुक्त शहरासाठी तरतूद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मनपाचे ३७८.९९ कोटींचे अंदाजपत्रक
By admin | Updated: February 28, 2017 00:29 IST