नाशिक : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने फाळकेस्मारक येथील बुद्ध स्मारक येथे बुद्ध जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी धम्म ध्वजारोहणाचे अनावरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्धस्मारक येथे बुद्ध जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ध्यानधारणा आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. सकाळी ११ वाजता बुद्धस्मारक आवारात पंचरंगी धम्मध्वजाचे अनावरण गौतम भालेराव, भन्ते धम्मदीप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे ५० भन्तेजी उपस्थित होते. दुपारी सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे दोनशे रुग्णांनी लाभ घेतला. भन्तेजींनी धम्मदेसना दिली. सायंकाळी चार वाजता गायक प्रतापसिंग बोदडे आणि संच यांचा बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास शहर परिसरातील नागरिक उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते भन्तेजींना चिवरदान करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. बौद्ध लेणी परिसरात हजारो बौद्ध बांधव पांढऱ्या पोषाखात उपस्थित होते. विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी स्मारकातील बुद्धमूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून बुद्धवंदना म्हटली. आवारात दलित साहित्य, समाजसुधारक तसेच महामानवांच्या जीवनावरील विविध पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. बुद्धम्... शरणम्...गच्छामी... च्या वंदनेने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. शहरातील आबालवृद्ध या ठिकाणी उपस्थित होते. बौद्धस्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सकाळपासून उपासकांनी दर्शनासाठी स्मारकात गर्दी केली होती. शहर परिसरातही ठिंकठिकाणी बुद्ध प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काही ठिकाणी खिरदान आणि आरोग्य शिबिरेही घेण्यात आली. बुद्ध विहारांमध्येही सकाळी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. परिसरात अनेक ठिकाणी जयंतीचे फलक लावण्यात आले होते. दरम्यान, वैशाख पौर्णिमेनिमित्ताने लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम ‘बुद्ध पहाट’ कार्यक्रम पार पडला, तर पंचवटीतूनही रॅली काढण्यात आली. (प्रतिनिधी)
बुद्ध जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी
By admin | Updated: May 5, 2015 01:16 IST