नाशिक : ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’चा गजर ब्रह्मगिरीच्या कातळांनाही भेदून गेला आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीला श्रद्धा व भक्तीने भारलेल्या त्र्यंबकनगरीत ब्रह्ममुहूर्तावर तीर्थराज कुशावर्त साधुत्वाच्या तेजाने झळाळून निघाला. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या व तृतीय शाहीपर्वणीला दहाही आखाड्यांतील शैवपंथीय साधू-महंतांनी शाही थाटात मिरवणुकीने येत कुशावर्तात स्नान करत भाविक-भक्तांचा निरोप घेतला. गेल्या महिनाभरापासून अखंडपणे सुरू असलेल्या मंगलमय कुंभपर्वाची समाप्ती होत असतानाच लाखो भाविक कुशावर्तात स्नान करत त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक झाले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी भाविकांना सुमारे २० कि.मी. पायपीट करावी लागल्याने पहिल्या पर्वणीचीच पुनरावृत्ती होत भाविकांच्या उद्रेकाला एसटी महामंडळासह प्रशासनाला सामोरे जावे लागले.नाशिक येथील तीनही पर्वणी आटोपल्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला अपेक्षेप्रमाणे भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली. पर्वणीपूर्वीच आदल्या दिवशी भाविकांच्या प्रचंड गर्दीने त्र्यंबकनगरीचा कोपरा-कोपरा व्यापला. गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत कुशावर्तात स्नानासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. त्यानंतर कुशावर्त साधू-महंतांच्या शाहीस्नानासाठी मोकळा करण्यात आला. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशावर्तावर आगमन झाले आणि त्यांच्या हस्ते मानसरोवरातून आणलेले जल कुशावर्तात प्रवाहित करण्यात आले. गुरुवारी उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी कुशावर्तात स्नान केले. त्यानंतर, खंडेराव मंदिरापासून पारंपरिक मार्गाने दहाही आखाड्यांची शाही थाटात निघालेली मिरवणूक भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली. प्रामुख्याने, नागा साधूंच्या नृत्य आणि कसरतींनी मिरवणुकीचा थाट आणखीणच वाढविला. भगव्या वस्त्रातील साधू-महंतांसह भाविकांचा सहभाग आणि छत्र-चामरासह बॅँडपथकाच्या साथीने निघालेली शाही मिरवणूक दहा तास चालली. पोलिसांनी ‘होल्ड अॅण्ड रिलिज’ पद्धतीचा अवलंब करत एकेक आखाड्यांना कुशावर्तापर्यंत नेऊन पोहोचविले. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या पंचदशनाम जुना आखाड्याने पहाटे ३.३५ वाजता कुशावर्तात प्रथम स्नान केले. त्यांच्यासोबत अग्नी आणि आवाहन आखाड्याच्या साधू-महंतांनी स्नान केले. त्यापाठोपाठ ठरलेल्या क्रमवारीनुसार पंचायती निरांजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल, बडा उदासीन व नया उदासीन आणि सरतेशेवटी निर्मल आखाड्याने स्नान केले. यावेळी आखाड्यांचे निशाण तसेच इष्टदेवता यांचे विधिवत पूजन करण्यात आले आणि स्नानानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेत आखाडे आपल्या परतीच्या मार्गाने रवाना झाले. यावेळी शाही मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ९.४५ वाजेपर्यंत आखाड्यांच्या साधू-महंतांचे स्नान चालले. त्यानंतर गर्दीचा अंदाज घेत पोलीस प्रशासनाने दुपारी १२ वाजेनंतर भाविकांना कुशावर्त खुले केले.
साधुत्वाच्या तेजाने झळाळले कुशावर्त
By admin | Updated: September 25, 2015 23:45 IST