नाशिक : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांना ब्रेक लागला आहे. मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व खातेप्रमुखांना दिले असून, शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर्स, फलक हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांवर असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विभागीय आयुक्तांचे पत्र प्राप्त होताच मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी खातेप्रमुखांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देतानाच मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही निर्णय घेण्यास मनाई केली आहे. गुरुवारी दुपारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक होणार होती, परंतु आचारसंहिता लागू झाल्याने आयुक्तांनी सदर बैठक रद्द केली. दरम्यान, आचारसंहितेमुळे शहरात राजकीय पक्षांचे बॅनर्स, फलक हटविण्याचे आदेशही संबंधित खातेप्रमुखांना देण्यात आले आहेत. तसेच विकासकामांच्या उद्घाटनांचे कार्यक्रमही थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांचे नामफलक झाकून टाकण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असून, पदाधिकाऱ्यांचीही वाहने जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात अत्यावश्यक बाब म्हणून कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागणार आहे. आचारसंहिता काळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने शुक्रवारी (दि.६) होणाऱ्या महासभेची केवळ औपचारिकता उरली आहे.
आचारसंहितेमुळे मनपाच्या धोरणात्मक निर्णयांना ब्रेक
By admin | Updated: January 6, 2017 00:17 IST