नाशिक : सराफ व कापड पेठेतील कोठावरील श्री बालाजी मंदिर संस्थानच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात येत्या २ आॅक्टोबरपासून ब्रह्मोत्सव साजरा केला जाणार असून, त्यात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी श्री व्यंकटेश बालाजींचा विमानोत्सव साजरा करण्यात आला.३०० वर्षे अधिक पुरातन असलेल्या कोठावरील बालाजी मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी विमानोत्सव साजरा करण्यात आला. श्री बालाजींची पूजा डॉ. रमेश महाराज बालाजीवाले व विक्रम बालाजीवाले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सजवलेल्या पाळण्यात श्री व्यंकटेशाचे आगमन झाले. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, दि. २ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत ब्रह्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यात दि. २ आॅक्टोबरला रात्री ८ वाजता सायली तळवलकर यांचे शास्त्रीय गायन, दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रा. क्षितिज पिटकुले यांचे ‘कर्दळीबन : एक अनुभूती’ या विषयावर व्याख्यान, दि. ४ रोजी सायंकाळी ५ वाजता त्रिदल महिला मंडळाचे भजन, दि. ५ रोजी रात्री ८ वाजता पंडित धनंजय जोशी यांची नाट्यसंगीताची मैफल आणि गोविंद पुराणिक यांची ताल परिक्रमा, दि. ६ रोजी रात्री ८ वाजता उदयोन्मुख कलाकारांची श्री बालाजी संगीतसेवा, दि. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ तबलावादक पंडित कमलाकर वारे यांचा प्रदीर्घ सेवेबद्दल सत्कार आणि तबलावादनाचा कार्यक्रम, दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता लोकमत सखी मंचच्या वतीने सामूहिक श्रीसूक्त पठण, दि. ९ रोजी रात्री ८ वाजता श्रिया सोंडूर यांचे शास्त्रीय गायन, दि. १० रोजी रात्री ८ वाजता ‘वेणूमधुरम’ हा बासरीवादनाचा कार्यक्रम, दि. १२ रोजी ह.भ.प. माधवदास राठी यांचे चाकरी भजन, दि. १४ रोजी रात्री ८ वाजता अखंड नाद संकीर्तन आणि दि. १५ रोजी रात्री ९ वाजता ‘रास गरबा’ आदि कार्यक्रम होणार आहेत.
कोठावरील बालाजी मंदिरात २ आॅक्टोबरपासून ब्रह्मोत्सव
By admin | Updated: September 27, 2016 01:38 IST