नाशिकरोड : कोटमगाव विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक मतदानप्रसंगी दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर निवडणुकीच्या निकालावरून रविवारी मध्यरात्रीनंतर डोंगर खाणीजवळ उभा असलेला ‘पोकलॅन मशीनवर’ ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आला. पोकलॅन मशीन जाळताना दोघे संशयितदेखील भाजले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक तालुक्यातील कोटमगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या दहा जागांसाठी रविवारी मतदान व मतमोजणी होती. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे तीन जण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात ग्रामविकास व परिवर्तन पॅनलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मतदारास मतदान केंद्रावर घेऊन जाण्यावरून सकाळी ९ वाजेच्या सुमारास वादविवाद झाल्याने हाणामारी होऊन दगडफेक झाली. यामुळे गावांत तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी संपत गोविंद घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मतदाराला त्यांच्या घरचेच मतदानाला घेऊन जातील असा ठराव झालेला असताना एका वयस्कर व्यक्तीला मतदानासाठी घेऊन जात होते. याबाबत विचारणा केली असता प्रकाश घुगे, ज्ञानेश्वर घुगे, अशोक घुगे, वसंत घुगे, अंबादास घुगे, भुषण घुगे, शरद घुगे, किरण घुगे, दिनकर म्हस्के यांनी शिवीगाळ, मारहाण करून दगडफेक केली. यामध्ये शिवाजी घुगे यांच्या गळ्यातील चैन गहाळ झाली. या दगडफेकीत फिर्यादी संपत घुगे, शिवाजी घुगे, सुभाष घुगे, विष्णू घुगे, सुरेश घुगे, रामनाथ घुगे, खंडेराव घुगे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रकाश दत्तू घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मतदानासाठी रांगेत उभे असताना एका वयस्कर व्यक्तीला सहकार्य करा, असे एका मतदानप्रक्रियेतील कर्मचाऱ्याने सांगितल्याने त्या वयस्कर व्यक्तीला मदत केली त्याचा राग मनाशी धरून संपत घुगे, शिवाजी घुगे, खंडु घुगे, किसन घुगे, रामदास घुगे, भानुदास घुगे, सुरेश घुगे, विष्णु घुगे, सुभाष घुगे, भास्कर घुगे, पप्पू म्हस्के, केशव म्हस्के यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत दगडफेक केली. यामध्ये फिर्यादी प्रकाश घुगे, अशोक घुगे, अंबादास घुगे, ज्ञानेश्वर घुगे, दिनेश म्हस्के, कचरू म्हस्के, पोलीस हवालदार टी. के. गायकवाड हे जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, संशयित केशव म्हस्के, भानुदास घुगे यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पोकलॅन मशीन पेटविलेयाबाबत पुष्पा ज्ञानेश्वर घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास आपल्या घरावर दगड फेकण्यात येऊन दरवाजा ठोठविण्यात आला. यावेळी भानुदास घुगे, अक्षय उर्फ सुभाष म्हस्के, गौरव शिवाजी घुगे, योगेश अशोक घुगे, पंडित रामदास घुगे व एक अनोळखी युवक यांनी तुमच्या घरच्यांनी आमच्या घराच्या काचा फोडल्या आहेत आम्हीपण तुमचे घर, गाड्या जाळू अशी धमकी देत निघून गेले. त्यानंतर रात्री अडीच वाजेच्या सुमारास घरासमोरील डोंगर खाणीजवळ मोठा आगीचा भडका झाल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी असलेला वॉचमन अशोक याने पोकलॅनला आग लागल्याचे फोनवरून घुगे कुटुंबीयांना कळविले. सदर घटनेची माहिती तत्काळ पोलीस, अग्निशामक केंद्राला कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व अग्निशामकच्या बंबाने पोकलॅन मशीनला लावलेली आग विझवली. सोमवारी सकाळी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, पी. आर. ढोकणे आदिंनी ग्रामस्थांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निफाड तालुक्यातील सायखेडाजवळील साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोकलॅन मशीनला आग लावताना दोघेजण भाजून जखमी झालेले उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. नाशिकरोड पोलिसांनी लागलीच साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली असता तेथे अक्षय उर्फ पप्पू सुभाष म्हस्के, राहुल रामदास तावडे, रा. पळसे हे दोघे उपचार घेताना मिळून आले. अक्षय ४0 टक्के व राहुल २२ टक्के भाजला आहे. दोघा जखमींना सोमवारी पहाटे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने भाजलो असे कारण सांगून त्यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.