लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त आणि डॉक्टर्स डे चे औचित्य साधत ‘लोकमत’ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या वतीने रविवारी (दि. २) शालिमार येथील आयएमए सभागृह येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून आयोजित या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.गंभीर आजाराच्या रुग्णांना किंवा अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते, अशावेळी तातडीने रक्त मिळणे आवश्यक ठरते. त्यामुळे आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, या सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सकाळी नऊ वाजेपासून आयोजित केलेल्या या शिबिरास सुरुवातीपासूनच स्वेच्छा रक्तदात्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रोटरी क्लब नाशिक मिडटाउन, मेट्रो आणि नॉर्थ नाशिक क्लब तसेच हास्ययोग समिती, नाशिक यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात प्रत्येकाने रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक नागरिकांनी या रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात एकूण ६० बाटल्या रक्त शासकीय रक्तपेढी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय रक्तपेढीतर्फे संकलित करण्यात आले. यावेळी आयएमएचे सचिव डॉ. हेमंत सोननीस, सहसचिव डॉ. किरण शिंदे, सदस्य मुकेश अग्रवाल, आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे रक्त पुरवठा संक्रमण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पुरी, डॉ. कविता गाडेकर, रोटरीचे राजेश सिंघल, रोटरी क्लब नाशिक मिडटाउनचे अध्यक्ष सुहास पाटील, सचिव राहुल वरखेडे, नॉर्थ नाशिक क्लबचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, नाशिक मेट्रोच्या अध्यक्ष मनीषा बागुल, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, हास्ययोग समितीच्या डॉ. सुषमा दुगड आणि प्रतिभा धोपावकर आदी उपस्थित होते.
रक्तदानाने जोपासली बांधीलकी
By admin | Updated: July 3, 2017 01:59 IST