देवळाली कॅम्प : रक्त तपासणीसाठी शाळेकडून बळजबरी करण्यात आल्याने चक्कर येऊन पडलेल्या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मुलांवर अशा प्रकार दबाव करणाऱ्या शाळेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाढू लागली आहे. प्रिती कुंभार असे या दुर्दैवी विद्यार्थीनीचे नाव असून, ती देवळाली छावणी परिषदेच्या शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होती. आठवड्याभरापूर्वी शाळेत आरोग्य तपासणीदरम्यान जबरदस्तीने रक्त चाचणी करत असताना प्रीती चक्कर येऊन पडल्याने जखमी झाली होती. देवळाली छावणी परिषदेच्या शाळेत गेल्या गुरुवारी आरोग्य तपासणी करताना रक्ताचे नमुने घेण्यात येत होते. यावेळी लॅमरोड भाटिया कॉलेजजवळ राहणारी प्रीती लक्ष्मण कुंभार (वय १३) हिने रक्ताचा नमुना घेण्यासाठी सुई टोचण्याच्या भीतीने तपासणीस नकार दिला होता. रक्ताचा नमुना घेण्यासाठी दोन मैत्रिणींना पकडण्यास सांगून तिच्या रक्ताचा नमुना घेतला. यामुळे प्रीती बेशुद्ध पडली. तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना गेल्या मंगळवारी रात्री साडेदहा वाजता निधन झाले.
रक्त तपासणीसाठी बळजबरी बेतली जिवावर
By admin | Updated: July 31, 2015 00:27 IST