नाशिकरोड : सावरकर उड्डाणपुलाच्या कमानीवर मित्रमेळा मंडळाने लावलेला सावरकर उड्डाणपूल नामफलक मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने काढल्याच्या निषेधार्थ मित्रमेळाच्या कार्यकर्त्यांनी व सावरकरप्रेमींनी तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. तसेच या कमानीच्या नामफलकाचे कायमस्वरूपी पालकत्व देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील उड्डाणपुलाच्या नामफलकाची मोडतोड झाली आहे. मनपाला त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. १०-१२ दिवसांपूर्वी सावरकर जयंतीचे औचित्य साधून मित्रमेळा मंडळाने स्वखर्चाने उड्डाणपुलाच्या त्या कमानीवर ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल’ असा डिजिटल नामफलक लावला होता; मात्र मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने मनपाच्या कमानीवर अतिक्रमण केले म्हणून तो नामफलक काढून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मनपा स्वत:च्या उड्डाणपुलाचा नामफलक व्यवस्थित ठेवत नाही; दुसरीकडे कोणी सामाजिक भावनेपोटी त्या कमानीवर फलक लावला तर अतिक्रमणाच्या नावाखाली काढून टाकते. मनपाच्या या ‘राजकीय’ वागण्यामुळे सावरकरप्रेमी व नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कमानीने पालकत्व द्यावे उड्डाणपुलाच्या कमानीला लावलेला नामफलक काढून टाकल्यामुळे मित्रमेळा व सावरकरप्रेमींनी गुरुवारी दुपारी दुर्गा येथील मनपा विभागीय कार्यालय प्रवेशद्वारावर तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. मनपा विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांना यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वा. सावरकर उड्डाणपूल नामफलकाचे कायदेशीर व कायमस्वरूपी पालकत्व सावरकरप्रेमी संघटना, मित्रमेळा युवक मंडळ व सावरकर प्रतिष्ठान भगूर यांना देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र ताजणे, रमेश पाळदे, दौलत शिंदे, सचिन सूर्यवंशी, दत्ता आगळे, सुनील माळदे, सूरज शेखरे, वैभव पगारे, शरद टिळे, नलिन ठाकूर, किशोर कानडे, शरद उगले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध
By admin | Updated: June 12, 2015 01:41 IST