महेश गुजराथी चांदवडयेथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे चांदवडकरांचे लक्ष लागून आहे. निवडणूक आयोग निवडणुकीची कोणती तारीख देते याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे व नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले असून गावात नवनवीन अफवांना पेव फुटले असले तरी भाजपाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात गेल्या तीन चार दिवसात एका अपक्ष उमेदवाराने भाजपाच्या गोटात शिरुन पाठिंबा दिल्याचे बोलले जात असून त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे मनसुब्यावर पाणी फिरले असले तरी ऐन वेळी काही चमत्कार होतो की काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निवडणुकीसाठी चांदवड नगर परिषदेच्या पहिल्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाला पाच, शिवसेना तीन, कॉँग्रेस चार, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोन, अपक्ष तीन असे १७ उमेदवार निवडून आल्याने स्पष्ट बहुमत असे झाले नाही; मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने आता चांदवडच्या नगराध्यक्षाचे भवितव्य अपक्षाच्या हाती होते. तर भाजपा- सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष होईल असा दावा केला होता. चांदवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण दिवाळीत झाले व नगराध्यक्षपद सर्वसाधारण जाहीर झाल्याने चांगली चुरस निर्माण झाली. या पदासाठी भाजपा-सेना याकडून तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून व्यूहरचना सुरू झाली. यासाठी भाजपाचे चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल यांनी भाजपाचाच नगराध्यक्ष कसा होईल याकडे जास्त लक्ष दिले. तर यासाठी शिवसेनेबरोबरची यशस्वी चर्चा झाली. शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपाला पाठिंबा देण्याची तयारी राज्याचे सहकारमंत्री दादा भुसे, तालुकाप्रमुख नितीन अहेर, राजकुमार संकलेचा, कारभारी अहेर, जगन्नाथ राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपा-सेनेचे एकमत झाले. दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला एकत्र घेत मोट बांधली खरी, त्यात जे तीन अपक्ष निवडून आले तेही कोतवाल गटाचेच होते. त्यामुळे बिनधास्त राहिलेल्या कोतवाल यांना एक अपक्ष उमेदवार त्यांच्याकडे शब्द देऊनही बाजूला गेल्याची चर्चा गेल्या चार-पाच दिवसात चांदवड शहरात होत आहे. भाजपा-शिवसेनेचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष झालाच तर विद्यमान भाजपाचे तालुकाध्यक्ष भूषण कासलीवाल हे नगराध्यक्ष व विद्यमान शिवसेनेचे शहराध्यक्ष जगन्नाथ राऊत हे उपनगराध्यक्ष होतील असा अंदाज आहे. या दोघांचीच दोन्ही पक्षाच्या गटनेते पदी जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंद झाल्याने ही शक्यता वाटत असली तरी चांदवडकर मात्र प्रत्यक्ष नगराध्यक्ष निवडणुकीच्या तारखेची वाट बघत आहे तर केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असल्याने चांदवडचे नगराध्यक्ष त्याच विचाराचे व्हावे अशी अपेक्षा काही नेते व्यक्त करीत असले तरी तारीख जाहीर होऊन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कोण होते याकडे चांदवडकरांचे लक्ष लागून आहे.
भाजपाचा नगराध्यक्ष तर शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता ?
By admin | Updated: November 19, 2015 22:31 IST